श्रीरामवरदायिनी माता म्हणजे तळ कोकणातील क्षात्रकुळाची कुलदेवता !!
शिंदे-कदमांचे आराध्य दैवत !!
१३ गावांच्या दसपटीची कुलस्वामिनी म्हणजेच श्रीरामवरदायिनी !!
चौदा वर्षाच्या वनवासात प्रभू रामचंद्र सितेचा शोध घेत विरही अवस्थेत फिरत असताना, सती पार्वतीला प्रभू रामचंद्रांची परिक्षा घेण्याची लहर आली. पार्वतीनं सितेचं रुप घेतलं आणि ती प्रभू रामचंद्रासमोर उभी राहून म्हणाली, "नाथ, आपण विरहानं व्याकुळ होऊन, माझा शोध कशाला घेता? मी तर इथेच आहे." प्रभू रामचंद्रांनी क्षणातच सती पार्वतीला अंतर्मनानं ओळखलं, आणि ते म्हणाले, "माते, मी तुला ओळखलं, तू माझी प्रिय 'सिता' नसून तू आदिशक्ती सती पार्वती आहेस, साक्षात माझी माता आहेस." पार्वती प्रसन्न झाली, आणि तिनं प्रभु रामचंद्रांना आशिर्वादपर वर दिला. "रामा, तुझी लाडकी सिता तुला भेटेल. ती निष्कलंक आहे. आणि तुझ्या हातूनच रावणाचा वध होईल. रावणांचं १४ चौकडयांचं राज्य नष्ट होईल. शेवटी तुझाच राज्याभिषेक होईल". प्रभु रामाला असा वर देणारी ती 'रामवरदायिनी'...!
कुलदेवता श्रीरामवरदायिनी हिचेबद्दल निरनिराळया आख्यायिका आहेत. शिंद्यांचे पूर्वज सोमाजीराव व सिदोजीराव हे बारराव कोळ्यांवर स्वारी करण्यासाठी निघाले, त्यावेळी एका महान् साधुने आशीर्वाद देऊन झोळीतून एक देवीची मूर्ती काढून त्यांस दिली व सांगितले की हे भाग्यशाली पुरुषा, तुला तुझ्या स्वारीत यश व दौलत मिळेल. पूर्वजांनी या देवीला नवस केला की, या स्वारीत मला यश आले तर तुझी मी स्थापना करुन माझी कुलदेवता म्हणून मानीन. (दुसरी आख्यायिका अशी आहे की, सोमाजीराव व शिदोजीराव हे बारराव कोळ्यांवर स्वारी करण्यासाठी येत असता देवीच्या दर्शनास जाऊन त्यांनी नवस केला, की, मला जर स्वारीत यश मिळाले तर तुझी मी माझी कुलदेवता म्हणून स्थापना करीन. पूर्वजांना विजय मिळाला व त्यांनी देवीस आपली 'कुलदेवता' मानून, तिची दादर येथे स्थापना केली.