श्रीरामवरदायीनीचे अवतार कार्याचे वर्णन प्रभुरामचंद्राच्या वाल्मीकी रामायणात केले आहे. प्रभूरामचंद्र वनवासात असताना सितामाईच्या अपहरणा नंतर शोकाकुल झाले होते. सितामाईच्या शोधार्थ वृक्षवेलींना, पाषाणांना आलिंगन देऊन स्पर्शीत असताना पार्वती श्रीप्रभूंना विचारती झालीं हे प्रभो, श्रीराम जर दशावतारधारी आहेत तर या मर्यादा पुरुषोत्तमाच्या अशा या शोकाकुलावस्थेत कारण काय? तेव्हा प्रभु म्हणाले त्यांचा हा स्पर्श शापितांच्या उध्दारासाठी अणि जगाच्या कल्याणासाठी आहे. केवळ सिता शोक नव्हें. त्यावर पार्वती मातेने स्मीतहास्य केले आणि श्रीरामांची सत्वपरिक्षा घेण्यासाठी तिने सितेचे रुप धारण करुन ती श्रीरामाच्या नजरक्षेपात उभी राहिली. क्षणार्धात प्रभूरामानी आपल्या अंत:ज्ञानातून पार्वतीला ओळखले. ते म्हणाले; माते, तू माझी सिता नसून तू जगद्जननी पार्वतीमाता आहेस. प्रभू रामांचे हे अवतारी रुप पाहून पार्वती प्रसन्न झाली व तीने रामांना आशीर्वाद दिला. सिताशुध्दीचा संदेश देऊन रावणाचा पराभव तुझ्या हातूनच होईल असा त्यांना वर दिला. अशाप्रकारे रामाला वर देणारी वरदायिनी असे शक्तीमातेचे नामाभिधान प्रसिध्द झाले. हिच श्रीरामवरदायिनी शिेंद कुलाची विरश्री म्हणून कुलस्वामिनी ठरली.
दसपटी येथील मंदिराच्या पुरातन वास्तुचा जिर्णोध्दार वेळोवळी त्या त्या काळातील कर्त्या पुरुषांनी, शास्त्यांनी मोठ्या श्र्रध्देने आणि भक्तीभावाने केला. इ.स. १५९० साली अक्षय तृतियेच्या मुहुर्तावर प्रथम पुरातन स्थळातील वास्तुचे नुतनीकरण व प्रतिष्ठापन झाली अशी नोंद सापडते. राजकीय स्थित्यंतरातील बदलत्या काळाप्रमाणे पुढे इ.स. १६८२ इ.स. १७३९ तसेच इ.स. १७७२ ते इ.स. १८५० साली त्या त्या काळातील कर्तृत्ववान सरदारांनी आणि कर्त्या पुरुषांनी सोन्या-चांदीची रुपी घडवून आपल्या कुलस्वामिनी देवीच्या मंदिराचा जिर्णोध्दार घडवून आणला.
अलिकडील स्वातंत्र्यपूर्व काळात इ.स. १९०१ तसेच १९३९ साली किरकोळ मंदिर दुरुस्तीच्या नोंदी सापडतात. त्यामुळे प्रामुख्याने कुठेही खंडित न पावलेली ही श्रीरामवरदायिानी कुलस्वामीनी मंदिराची जिर्णोध्दार परंपरा खर्या अर्थाने सर्वांगाने विकसीत झाली ती इ.स. १९७२ साली, अस म्हणावं लागेल. देशभक्तीची भावना जिथे वास करुन राहिली, अशा या दसपटीतील ग्रामस्थांच्या संघटनात्मक जिर्णोध्दार समितीतून विविधतेतील एकता स्पष्ठ दिसून आली आणि इ.स. १९७२ साली अक्षय तृतियेच्याच दिवशी हा जिर्णोध्दाराचा सुखसोहळा पार पडला. अशा या पवित्र परंपरेतूनच आजच्या या नूतन वास्तु संकल्पनेचा जन्म झाला. इ.स. २००१ साली कुलस्वामिनी श्रीरामवरदायिनीच्या या मंदिराचा साकार झालेला जिर्णोध्दार प्रकल्प म्हणजे तमाम दसपटी विभागातील लोकजीवनाचे व पारंपारिक अस्मितेचे शिल्प ठरले असून येथील सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक उत्कर्षाचे ते मनोहर मनमोहक प्रतिक आहे असंच वाटतं!
मुख्य मंदिर प्रकल्प...
या ठिकाणी भेट देताना प्रशस्त मंदिराच्या आवारात प्रवेश केल्यावर प्रवेशद्वारातच श्रीगजानन व श्रीसाईबाबा यांची छोटी मंदिरे पाहायला मिळतात. चहुबाजूनी आधुनिक पध्दतीची कंपाऊंड असून मंडपा समोरील नयनरम्य बगीचा मंदिराची शोभा विशेष वाढविताना दिसुन येतो. विशाल पायऱ्यांची रचना चढून आपण सभामंडपात प्रवेश करताना समोरच श्रीरामवरदायिनीची अश्वारुढ मूर्ती पाहून लोचन सुखावून जातात. चहूबाजूनी आकर्षक बांधणीचे बांधकाम असलेल्या मंदिराच्या सभामंडपात पर्यटकांसाठी बसण्याची उत्तम व्यवस्था केलेली आहे. मंदिरातील सामानाची योग्य व्यवस्था व्हावी यासाठी मंदिरात तळघराची सोय केलेली असून, पूजेसाठी स्वतंत्र खोली, छोटे स्वयंपाक घर (नैवैद्यासाठी), छोटा मंच, बैठक हॉल, ट्रस्टचे कार्यालय, भांडार अशी अंतर्गत मांडणी रचनात्मक असून प्रत्येक ठिकाणी सुरक्षिततेला प्राधान्य दिले आहे.
पर्यटकांच्या सोई सुविधांच्या दृष्टीने ट्रस्टच्या भावी नियोजनात्मक कामाना सुरुवात झाली असून कार-स्कूटर पार्किंग झोन, प्रसाधनगृह, रेस्टहाऊस, अंतर्गत रस्ते, पाण्याची टाकी, रंगमंच आदी कामाना प्राधान्य देण्यात आले आहे. उत्सवाच्या काळात होणार्या गर्दीचे भान राखून येथे येणार्या भक्तगणांची सर्वांगीण योग्य काळजी घेण्याच्या दृष्टीनेच भावी सुधारणांची गती राहणार असून अपेक्षित उध्दिष्ठ लवकरात लवकर साध्य करण्याचा येथील श्रीरामवरदायिनी मंदिर देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी आणि कार्यकत्र्यांचा दृढ निश्चय आहे.
श्री क्षेत्र श्रीरामवरदायिनी परशुराम भूमीतील एक धर्मस्थळ
प्राकृतिक दृष्ठ्या वेगळा असलेला परंतू महाराष्ट्रातील ऐतिहासिक सांस्कृतिक घटकांशी संबंधीत असणारा राज्याचा एक भाग म्हणजे कोकण प्रांत होय! या कोकणास प्रदीर्घ प्राचिन परंपरांचा वारसा लाभला आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे पुरातन संशोधन विभागाला कोकणातील गुहागर तालुक्यात पालशेत या गांवी अश्मयुगातील मानव वास्तव्याचे सापडलेले पुरावे. (गुहा-हत्यारे) तसेच दापोली तालुक्यातील लेणी, आणि इतर अन्य असे उत्खननातून संस्कृती, संशोधनातील घटक प्रकर्षाने निदर्शनास येतात. यामधून तत्कालीन निसर्ग-संस्कृती, भौगोलिक रचना, सामाजिक व्यवस्था, याचा अभ्यास करता येतो, त्याच बरोबर प्राचीन समाजाच्या सृजनशिलतेची, प्रगल्भतेची आणि सांस्कृतिक समानतेची जाणीव स्पष्ट होते. या कोकणचा निर्माता ज्याला म्हटले जाते, असे कोकणचे आराध्य दैवत असलेले जमदग्नीपुत्र भगवान श्रीपरशुराम यांचे पुरातन मंदिर पुढे गावातील डोंगरावर श्रीक्षेत्र परशुराम या नांवानेच प्रसिध्द आहे. या आराध्य दैवताबरोबरच कोकणातील प्रत्येक गावोगावी उपास्यदैवता म्हणून ग्रामदेवता आणि कुलदेवतेची उपासना करण्याची प्रथा येथे प्राचीन काळापासून प्रचलीत आहे. त्यामुळे पाषाणी बांधकाम असणारी ग्रामदेवतेची सार्वजनिक मंदिरे गावोगावी पहावयास मिळतात. कोकणातील चिपळूण तालुक्यात मुख्यशहरापासून काही किलोमीटर अंतरावर असणारे, सह्याद्रीच्या पायथ्यालगतचे मजरे दादर येथील दसपटी विभागातील कुलदेवता "श्री क्षेत्र रामवरदायिनी" हे प्रसिध्द देवस्थान महाराष्ट्राच्या धार्मिक पर्यटन स्थळामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
भौगोलिकदृष्टया स्थनिर्देश :-
कोकणची भौगोलिक रचना ही आधुनिक काळाचे आकर्षण ठरावी अशी पर्यटनसाठी प्रसिध्द आहे. पश्चिमेस अरबी समुद्र, पूर्वेस सह्याद्रीच्या शिखरांच्या रांगा, उत्तरेस तेरेखोल खाडी यांच्या दरम्यानचा सुमारे ७२० कि.मी. लांबीचा आणि ५० ते १०० कि.मी. रुंदीचा प्रदेश म्हणजे कोकण. इ.स. पूर्वी चौथ्या शतकापासून लिखीत साहित्यामध्ये या भागातील माहितीचा उल्लेख आढळतो. सुरवातीपासून उत्तर कोकण व दक्षिण कोकण असे दोन भाग आहेत. त्यापैकी उत्तर कोकणात चिपळूण शहराच्या पूर्वेस १६ ते १७ कि.मी. अंतरावर मौजे कळकवणे तर्फे मजरे दादर-दसपटी या गांवी श्री क्षेत्र रामवरदायिनीचे भव्य मंदिर उभारले आहे. चिपळूण-कराड राजमार्ग क्र. ७८ लगत असणाया कान्हे-पिंपळी गावातून राजमार्गाला जोडून पूर्वेकडे वळणारा रस्ता या मंदिराकडे जातो.
श्री क्षेत्र रामवरदायिनी कुलस्वामीनीचे मंदिर हे वैतरणा व पंचगंगा यांच्या संगमापासून कांही अंतरावर उभारले असून, विस्तीर्ण पठारावर उभी असलेली ही नूतन वास्तु प्रेक्षणीय असून दसपटी विभागाच्या मध्यभागी आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिरापासून काही अंतरावर पूर्वेला दिसणारी सह्याद्री पर्वताची गिरी-शिखरं येथील मनमोहक वातावरणात भर घालतात. या मंदिराची स्थापना १५ व्या शतकांत झाली अशी कागदोपत्री नोंद आहे.
योध्यांची विरश्री, राजे-सरदारांना अभय देऊन विजयश्रीचे वरदान देणारी वरदायिनी (प्रतापगडवासीनी) अशी ख्यातकीर्त पावलेली देवी, आणि श्रीरामाला वर देणारी ती श्रीरामवरदायिनी. अशा या देवीची स्थापना या क्षात्रकुलीन सरदारांच्या विजयश्रीचे प्रतिक आहे. आजही या देवीचा आशीर्वाद घेऊन देशरक्षणासाठी सैन्य दलात भरती होणारे, पोलीस विभागात कार्यरत असलेले, तसेच प्रशासकिय सेवेत निष्ठेने आपली जबाबदारी सांभाळणारे येथील स्थानिक भूमिपूत्र-तरुणांची संख्या लक्षणीय आहे. ही गौरवास्पद बाब असून त्याच क्षात्रतेजाची प्रचीती आहे.
नूतन वास्तूची शिल्पाकृती :
विस्तीर्ण परिसर लाभलेल्या या मंदिराची बांधणी हा एक वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना आहे. निसर्गाचा अनोखा देखावा असणारे व येणार्या पर्यटकांना येथे भेट देताना वेगळाच आनंद प्राप्त करुन देणार्या या मंदिराची रचना कोकणातील धार्मिक स्थळांत एक आगळे-वेगळेपण सिध्द करते. मंदिरात प्रवेश करतानाच प्रवेशद्वारातील भव्य बगीचा मनाला प्रसन्नता मिळवून देतो. २५८ फूट लांब व १५४ फूट रुंद असलेल्या या बागेमधील रंगीबीरंगी फुलझाडे मंदिराची शोभा वाढवितात. विस्तीर्ण व्हरांड व गॅलरीतून मंडपात प्रवेश करतानाच समोरील अश्वारुढ मूर्ती आपले लक्ष वेधून घेते. ९७ फूट लांब व ३२ फूट रुंद असा सभामंडप या नूतन वास्तुचे आकर्षण विशेष वाढवितो. आलेल्या भाविकांना येथे निवांत बसण्याची सोय आहे. मंदिरात साजरे होणारे उत्सव व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी ४र् X ३५ फूट आकाराचे स्टेज बांधण्यात आले आहे. श्रीरामवरदायिनीचा गाभारा १र् X १७ फूटाचा असून सामानासाठी स्वतंत्र खोली आहे. मंदिर परिसरात खेळासाठी भव्य पटांगणाची व्यवस्था केली असून नियोजित वेळेप्रमाणे खेळाडूंच्या विविध स्पर्धा येथे आयोजित केल्या जातात.