आदिक्षेत्र पार्वतीपूर.... पार गावची श्रीरामवरदायिनी
एकेकाळी जागृत ज्वालामुखीचा प्रवेश म्हणून कोकण व कोकणातील हा सह्याद्रीच्या कुशीत वसलेला भाग विख्यात होता. येथील दऱ्याखोऱ्या, डोंगरकडे व त्यात आढळणारे अत्यंत कठीण असे अश्म त्याची साक्ष आजही देतात, अध्यात्म, साहित्यापासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक क्षेत्रात अतुलनीय कामगिरी बजावणारी व्यक्तिमत्वं लाभण्याचं वरदान या कोकण भूमीला प्राप्त झालं आहे. अनेक नररत्नांची कर्मभूमी-जन्मभूमी होण्याचे भाग्य तिला लाभलं आहे. एकीकडे सह्याद्रीच्या शिखरांनी जिची पाठराखण केली तर दुसरीकडे सागर लाटानी तीच्या चरणांचे सदैव प्रक्षालन केलं; अशा या त्रिभूवनवीर परशुरामांच्या भूमीला शौर्याची, इतिहासाची, कर्तृत्ववाची परंपरा लाभली आहे. वेळोवेळी पराक्रमांच्या अग्नीपरीक्षा देणारे नरवीर येथे जन्माला आले तसेच कोकणचं लोभस व प्रत्ययकारी प्रतिबींब प्रकट करणारे मान्यवर साहित्यीक आणि कवी देखील येथेच जन्मले. भक्ती व अध्यात्माची प्रेरणा देणारी कविता या मातीत फूलली आणि त्यातूनच कोकणची माती व प्रेमळ माणसं व्यक्त झाली. येथील निसर्ग हाच मुळी मांगल्याची, पावित्र्याची निर्मिती करतो. या भागातील पुरातन मंदिरे व येथील धर्मक्षेत्र ही आजही याची साक्ष देताना दिसून येतात.
याच सह्याद्रीच्या कुशीत महाबळेश्वराच्या पश्चिमेस २० कि.मी. अंतरावर असलेल्या पार या गांवी श्रीरामवरदायिनीचे मूळ पुरातन मंदिर आहे. पुरातन काळात या गावाला क्षेत्र पार्वतीपूर या नावाने ओळखले जात असे. प्रतापगडापासून अवघ्या ३ कि.मी. अंतरावर हे गांव असून पूर्वी या गावाला फार मोठे ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले होते. धार्मिक, ऐतिहासिक आणि तिर्थक्षेत्र म्हणून वारसा मिळालेली पार येथील श्रीरामवरदायिनी देवता ही महाराष्ट्रातील काही घराण्यांची कुलदेवता आहे. आदिशक्तींने कारण-परत्वे जी विविध रुपे घेतली त्यापैकीच एक सौम्य स्वरुपातील पण विरश्रीचे वरदान देणारी ही देवी समर्थ रामदास स्वामी, छत्रपती शिवाजी महाराज आणि चंद्रराव मोरे यांची कुलदैवता असून प्रतापगडावरील भवानीचे ते प्रतिरुप आहे असा उल्लेख इतिहासात मिळतो.
श्रीरामवरदायिनी हे आदिशक्तीचेच रुप आहे. आदिशक्तीने युगायुगात अनेक प्रकारची रुपे धारण केली आहेत. वेगवेगळया अवतारात अनेक दैत्यांचा संहार केल्याच्या कथा देवी पुराणात पुष्कळ आहेत. तसेच या देवीन सुरश्रेष्ठ ब्रह्मा, विष्णू, महेश यांनाही वर देऊन त्यांचे समाधान केले आहे.
कला काष्ठादि रुपेने । परिणाम प्रदायिनी ।
सुरश्रेष्ठाना वर देऊनी । जगती नाम वरदायिनी ।।
वेळोवेळी या वचनाप्रमाणे आदिशक्ती वरदायिनीने देवांना वर देऊन त्यांच्या संकट निवारणाचे कार्य प्रत्येक युगात केले आहे.
