|| अनादि सोऽहम् कुलस्वामिनी रामवरदायिनी नमो नमः || || नित्य कराहो नामस्मरण सुखी होइल जीवन ||

बारराव कोळयांचा किल्ला


मौजे पेढांबे, खडपोली आणि कळकवणे यांचे सीमा मध्यावर १५०० फुट उंचीवरील डोंगरावर बारराव कोळीयांचा बाकई किल्ला आहे. किल्ला स्वयंपूर्ण असून त्याचे जीर्णतर अवशेष अद्यावत दिसून येतात. दारुगोळा कोठारे, तळी, विहीरी यंत्रे असून गवती व शेती जमीनही विपूल आहे. तटावरुन उड्या मारुन सती गलेल्या बारराव कोळ्यांचे स्त्रियांच्या जागेस सतीचा कडा म्हणतात. किल्ल्यावर घोड्यावरुन जाण्यास पुरातन पायवाट आहेत. वरती वेताळ बुरुज आहे. येथून श्री क्षेत्र परशुराम, दाभोळ खाडी, किल्ले अंजन वेल, गोवळकोट, तिव्ररे घाट आणि कुंभारली आदी दुर्बीणीने पहिल्यास स्पष्ट दिसतात. त्यावरुन बारराव कोळ्यांनी आपले निवासस्थानी किल्ला किती धूर्तपणे बांधला होता त्याची कल्पना येते.

बारवई किल्ल्याच्या पायथ्याशी वैतरणा नदीकांठी मौजे दसपटी पेढांबे हे गाव असून त्याची भावबंधी पेढांबे, खडपोली, कळकवणे या गावात असून त्या सर्वांस पेढांबकर असेच म्हटले जाते. पेढांबे येथे दसपटीचे वडील घराणे असल्या कारणाने मानपान, न्याय मनसुबी वगैरे आदी अधिकार त्यांचेकडेच होते आजवर त्यांचा बहुमान राखला जातो हे विशेष होय, कोणत्याही प्रकरणी न्याय. मनसुबा करीता चिट्टया करणे व न्याय मनसुबी चालवीणे व ते आमलात आणणे वगैरे पेढांबकरच करीत असत श्रीरामवरदायीने कुलस्वामिनीच्या उत्सवकार्यप्रसंगी निमंत्रणे मात्र नांदवीसकर हे हिंदू धर्मशास्त्रकरुप वडीलकीचे नात्याने पेढांबकर म्हणून करीतात.

मौजे कोळकवाडी येथे बारराव कोळी यांचा ओवरी (कोरीव लेणी) गुप्त निवासस्थान आहे तेथे १२ खोल्या असून त्या बारराव यांच्या आहेत. हे स्थळ जंगली जयगडाचे नजिकच आहे ओव्याचे मध्यभागी सभामंडप असूनच येथून गोवळकोट खाडीतील देखावा दिसतो. श्री क्षेत्र परशुरामाचे देवालयाचा दर्शनी दरवाजा व कळस दिसतो. उत्तरेस बारवाई किल्ला दिसतो. पूर्वेस तिवरे घाटी वृंदावन दिसते व नांदिवसे येथील भैरवगढी (किल्ला) दिसतो तो अत्यंत जीर्ण झालेला असून नाममात्र अवशेष राहिलेले आहेत. याच भैरवगढीचे पायथ्यास नांदीवसे येथील भैरवाचे पुरातन देवस्थानही आहे. कोळकवाडीत मुळगावी भिमेश्वराचे देवालय असून येथून बाररावांच ओव्यापर्यंत पायतास आहेत. नित्यनेमे बारराव घोड्यावर बसून भिमेश्वराचे दर्शनास येत असत. या ओव्याचे खाली घोड्याच्या पागा व चोऱ्या असून त्यांची घरटे अतिजळीवस्थेत आहेत. १२ व्या ओव्याचे डोक्यावरती पाण्याचे सुर्यदर्शनी टाके असून जवळच असलेल्या खडीच्या उलट बाजूस घणघणी नावाच्या पाण्याचे टाके असून शिवाच्या त्रीमूर्ती आहेत. हे टाके बारमाही एकाच पातळीत असते. पावसाळी पण आटत नाही. खडीवरुन पाण्याचा झोत पडतो त्यास जंगल झोत म्हणतात. हे पाणी अती उंचावरुन पडत असल्यामुळे वाऱ्याचे जोराने ते वरचेवर फेकले जाते. जमीनीवर एक थेंबही पडत नाही. या विस्मयकारक घटनांनी मन थक्क होते.

मौजे नागावे येथे श्री. सुकाईचे प्राचीन देवस्थान असून ते यशवंतराव शिंदे, मोकाशी पेढांबकर यांचे कारकिर्दीत वैभवास आणले गेले. मोकाशी पेढांबकर यांचे कारकिर्दीत वैभवास आणले गेले. आजला श्री. चे डावे बाजूस शिलालेख होता परंतु पुंडाईत तो नष्ट केला गेला असला तरी त्या शिलालेखावरील नक्षीदार कमान अद्याप त्याची साक्ष देत आहे. मौजे नांदीवसे येथे भैरवांचे पुरातन देवस्थान भैरव गढीचे पायथ्यास होते. ते पुढे त्याचे पुजारीयांचे विनंतीवरुन खाली आले ते भैरव खो्ऱ्यात वैतरणाभैरवनदीचे पात्रांत निसर्गरम्यस्थळी दाट आरण्यांत आहे. नांदिवसेचे भैरीचे महात्म्य अगाध आहे. इथे कोणी साप चाऊन सहसा मृत्यू पावत नाही. त्यास भैरवाचा अंगारा लावल्यास गुण येतो. भैरवाचे जुन्या मंदीराचे खाली भैरवाची सप्त टाकी आहेत. त्यात स्नान करुन या सप्तगंगाचे पाण्याने गुरव भैरवास स्नान घालीत असत. नांदीवसे येथे स्वयंदेवाचे पुरातन जागृत असे स्वयंभू स्थान आहे. ते स्वयंदेव वैतरणेच्या संगमावर आहे. सोमाजीराव शिंदे पेढांबकर हे नांदिवसे येथे येऊन वस्तीस राहिल्यापासून त्यांनी या स्वयंभू क्षेत्राचे महात्म्य वाढविले आहे. येथे भैरव टाक्या नजीक धर्म भिन्त असून येथून कडेलोटाची शिक्षा दिली जाई.

मोरवणे येथे श्री रामवरदायिनीचे देवस्थान आहे व त्याचे पलिकडचे भिंताड येथे पागा आहेत. खडपोली येथेही जुन्या पागा आहेत. तिवरे येथे वाघजाईचे पुरातन देवस्थान असून मल्लिकार्जुनाचे पूरातन देवस्थान आणि स्वयंवर तळे आहे. पेढांबे येथे वाघजाईचे, सुखाईचे देऊळ आहे. तिवरे येथे गंगेच्या खो्ऱ्यात दर तीन वर्षांनी गंगा येते. हजारो लोक दर्शनास जातात. तीवरे घाट पुरातन काळापासून प्रसिध्द असून देशावरुन लमाणांचे तांडेचे तांडे या वाटेने कोकणात व्यापारासाठी येतात.